ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास चौकातील तथागत कॉम्प्लेक्ससमोर सांडपाण्याचा प्रश्न गंभीर!

आठ दिवसांपासून मुख्य रस्त्यावर सांडपाणी; दुकानदार व नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांच्या परिसरात असलेल्या विकास चौकातील तथागत कॉम्प्लेक्ससमोर गेल्या आठ दिवसांपासून सांडपाणी नालीतून बाहेर येऊन मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील नागरिक, दुकानदार आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधी आणि संभाव्य आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढला आहे.

विकास चौक हा शहरातील महत्त्वाचा परिसर असून, येथे विविध शासकीय कार्यालये, दुकाने आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचत आहे. विशेषतः हायमास्ट विद्युत खांबाजवळ सांडपाणी जमा झाल्याने परिसरातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या साचलेल्या पाण्यामुळे लहान मुलांना, दुकानदारांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्यातून दुचाकी व इतर वाहने जात असल्याने पाणी उडण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकीकडे शहराच्या स्वच्छतेवर भर दिला जात असताना, दुसरीकडे मुख्य चौकातील रस्त्यावर आठ दिवसांपासून सांडपाणी वाहत असल्याने स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या समस्येकडे संबंधित यंत्रणेने अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात

विकास चौकातील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवून नालीची दुरुस्ती करावी, सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक व दुकानदारांकडून होत आहे. सेलू नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येवर आता तरी नगरपंचायत प्रशासन ठोस पाऊल उचलणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये