बुलढाणा येथे अन्न व औषध प्रशासन प्रशासनने केली कारवाई
11.21 लाख रुपयांचा साठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलढाणा : उत्पादन सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत बिरसिंगपूर, बुलढाणा येथील मे. बालाजी इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. आस्थापनेतील अस्वच्छता व अन्न सुरक्षेतील त्रुटींमुळे अन्न व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असून, ११ लाख २१ हजार ७५६ रुपये किमतीचा सुमारे ६,२२६ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान खाद्यतेलांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
१. रिफाइंड सोयाबीन तेल — ३,७७१.२६ किलो; किंमत ₹६,६३,०६३/-
२. रिफाइंड सूर्यफूल तेल — २,४५५.४० किलो; किंमत ₹४,५८,६९३/-
तपासणीत तांत्रिक व्यक्ती व FoSTaC प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध नसणे, कीटक नियंत्रण कार्यक्रम व अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा नसणे, टाक्यांच्या स्वच्छतेचे अभिलेख आणि पॅकिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र उपलब्ध नसणे आदी त्रुटी आढळल्या. कच्चे व तयार अन्नपदार्थ पॅलेटवर साठविण्याची सुविधाही नव्हती. त्याच परिसरात भुईमुगाच्या टरफलांपासून ब्रीकेट तयार होत असल्याने सूक्ष्म धुळीमुळे खाद्यतेल दूषित होण्याचा संभाव्य परिस्थिती आणि अन्न व्यवसाय चालकाने रिपॅक केलेले खाद्यतेल स्वतःच्या प्रयोगशाळेत अथवा NABL मानांकित प्रयोगशाळेतून तपासून घेतलेले नव्हते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रिफाइंड सोयाबीन तेल व रिफाइंड सूर्यफूल तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन, विश्लेषण अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित साठा जप्त करून ठेवण्यात येत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई मा. अन्न सुरक्षा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे व मा. सह आयुक्त (अन्न), अमरावती विभाग, श्री. एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (अन्न), बुलढाणा, श्री. प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अ. सं. भोपाळे यांनी केली.



