सोनालीताईं गावंडे यांच्या प्रवचनाने मोझरी गुरुकुंज आश्रम मंत्रमुग्ध
ग्रामगीता हाच खरा आदर्श ग्राम विकासाचा महामंत्र : सोनाली गावंडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गुरुकुंज आश्रम मोझरी येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी चे वतीने वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ ला श्रीगुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या महिला कार्यकर्त्या ग्रामगीताचार्य सौ. सोनालीताई अमोल गावंडे यांचे ग्रामगीता प्रवचन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आपल्या सुश्राव्य वाणीने व प्रभावी विचारांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. प्रवचनातून सोनालीताईंनी ग्रामगीतेतील ‘ग्रामनिर्माण’ पंचकाचे महत्त्व विशद केले. यामध्ये ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माणकला, ग्रामआरोग्य आणि गोवंशसुधार या अध्यायावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सामुदायिक प्रार्थना, रामधून, व्यसनमुक्ती, सुसंस्कार, जीवनशिक्षण यांचे महत्त्व ग्रामगीतेतील संदर्भ देऊन स्पष्ट केले. ग्रामगीतेतील विचारांचा प्रत्यक्ष जीवनात अंगीकार करूनच आदर्श गावाची निर्मिती व समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल, हा त्यांच्या प्रवचनाचा मुख्य संदेश उपस्थितांच्या मनावर ठसला. याप्रसंगी सोनालीताईंनी स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या प्रेरणेचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तसेच आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, पद्मश्री जनार्धनजी बोथे, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, माजी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे व्यक्त केले.
सोनालीताईंच्या प्रभावी प्रवचनसेवेची अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख गोपाल कडु, मानव सेवा छात्रालय चे अधीक्षक अमोलजी बांबल अरविंद राठोड यांनी प्रशंसा केली.याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ, भद्रावतीचे गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, मधुकर बांदुरकर आणि अरुण मुरकुटे उपस्थित होते.
गुरुदेवांच्या पवित्र कार्यभूमीत, गुरुकुंज आश्रमात पोहोचून ग्रामगीतेतील विचारांचा प्रसार करण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनालीताईंचे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले आणि त्यांच्या पुढील प्रवचनसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



