तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तानातून तीन बकऱ्या, दोन पिल्लांची चोरी
देऊळगाव राजात शेळीपालकाला ६० हजारांचा फटका; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरातील तहसील कार्यालयाजवळील कब्रस्तानातून तीन बकऱ्या आणि दोन लहान पिल्ले अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत शेळीपालकाचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृतनगर, देऊळगाव राजा येथील जाहेदाबी दिलदार शहा (वय ६०) हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या मालकीच्या तीन बकऱ्या आणि दोन लहान पिल्लांना ४ सप्टेंबर रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तान परिसरात चराईसाठी सोडले होते. सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान या पाचही शेळ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटना लक्षात आल्यानंतर फिर्यादीने परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात शेळ्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. चोरीस गेलेल्या तीन बकऱ्या आणि दोन पिल्लांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी जाहेदाबी दिलदार शहा यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ४०७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३२ वाजता दाखल करण्यात आला.
या चोरीप्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाण्यातील सफौ नारायण गिते करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच चोरीस गेलेल्या शेळ्यांची संभाव्य विक्री किंवा वाहतुकीच्या दिशेने तपास केला जाण्याची शक्यता आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे..



