ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुक आरक्षण सोडतीसाठी १० व ११ जूनला विशेष ग्रामसभा

ग्रामपंचायतनिहाय नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार प्रक्रिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुक्यात निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीसाठी १० व ११ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात तहसीलदार गोंडपिपरी यांनी आदेश जारी करून विविध विभागांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि नियमानुसार ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया ग्रामसभांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार असून संपूर्ण कार्यवाही पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.

गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकर यांच्या आदेशानुसार, महसूल, पंचायत समिती, कृषी तसेच इतर शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांवर ग्रामसभांचे नियोजन व देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निर्धारित कालावधीत तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील आरक्षण सोडत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. कोणत्या प्रभागातील जागा कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार यावर आगामी निवडणुकीची समीकरणे अवलंबून असल्याने गावागावांत चर्चांना उधाण आले आहे.

तहसील प्रशासनाने ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट, युवक मंडळे तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामसभा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये