५.५८० ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद
वरोरा पोलिसांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
वरोरा : वरोरा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पद्मालय नगर परिसरातील एका इसमाकडून तब्बल ५.५८० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत ड्रग्जसह एक चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पद्मालय नगर येथील एका वाहनात अवैधरित्या एमडी ड्रग्ज साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरोरा पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीकी (वय ३६, रा. पद्मालय नगर, वरोरा) याला ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातील वाहनातून चार झिपलॉक प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलेले पांढऱ्या रंगाचे ५.५८० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आले. जप्त ड्रग्जची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून १० लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ फॉर्च्युनर कार तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत डीबी पथकाचे सपोनि शरद भस्मे, पो.हवा. नवघरे, रुपेश मुल्लेमवार, सुखराज यादव, पोअ. महेश गावतुरे, सौरभ कुलथे, विशाल राजूरकर, मनोज ठाकरे व तेजस्विनी गारघाटे यांनी सहभाग घेतला.
वरोरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, “ड्रग्जमुक्त वरोरा” मोहिमेला बळ मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.



