ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरकरांसाठी आणखी एक दिलासादायक पाऊल!

जागेअभावी रखडलेला ऊर्जानगरच्या सांस्कृतिक सभागृहाचा प्रकल्प आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मार्गी

चांदा ब्लास्ट

महानिर्मितीकडून दोन एकर जागा निःशुल्क भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यासाठी कार्यवाहीला गती

आ. मुनगंटीवार यांनी घेतली अतिरिक्त सचिव आभा शुक्ला यांची भेट; लवकरच सभागृहाच्या बांधकामाला होणार सुरुवात

ऊर्जानगर येथील नागरिकांनी मानले आमदार मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर : चंद्रपूरकरांच्या विकासासाठी सातत्याने आग्रही राहणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ऊर्जानगर (चंद्रपूर) येथे मंजूर १५ कोटी रुपयांच्या भव्य सांस्कृतिक सभागृहाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जागेअभावी रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली दोन एकर जागा महानिर्मितीकडून निःशुल्क भाडेतत्त्वावर उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आ. मुनगंटीवार यांनी ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त सचिव आभा शुक्ला यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर आभा शुक्ला यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ऊर्जानगर येथील १५ कोटी रुपयांच्या या भव्य सांस्कृतिक सभागृहाच्या उभारणीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. जागेअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला आ.मुनगंटीवार यांनी गती दिली. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असून, चंद्रपूरकरांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करणारे हे सभागृह लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे.

सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी कार्यादेश यापूर्वीच निर्गमित झाला असून, जागेसंदर्भातील अडचणीही आता दूर होणार आहेत. त्यामुळे या बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पामुळे ऊर्जानगर परिसरासह संपूर्ण चंद्रपूर शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांना एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साकार होत असलेले हे सांस्कृतिक सभागृह ऊर्जानगर परिसराच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होणार आहे. रखडलेल्या प्रकल्पाला गती देऊन जागेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ऊर्जानगर परिसरातील नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये