ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तलावातील गाळ विकून “नाम” संस्थेला केले बदनाम..!

मंगलपेठ येथील तलावातील गाळ व्यावसायिकाच्या घशात ; गाळमुक्त धरण_गाळयुक्त शिवार योजनेला गालबोट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

“गाळमुक्त धरण_गाळयुक्त शिवार” ही योजना महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत चालवली जाते. या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी कोणत्याही एकाच संस्थेला काम दिलेले नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेचे काम करणाऱ्या नामांकित “नाम” संस्थेला तलावातील गाळ विक्री प्रकरणात बदनाम करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासन आणि नाम संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी या संस्थेची प्रतिष्ठा धुळीस लावल्याचा प्रकार पुढे आल्याने, तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “गाळमुक्त धरण_गाळयुक्त शिवार” या योजने अंतर्गत धाबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगलपेठ येथील मामा तलावतील गाळ उपासण्यात आले. उपसण्यात आलेला गाळ अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतासाठी दिला जायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. शेतीच्या नावावर जमीन सुपीक बनविणारा हा गाळ व्यवसायासाठी वापरला गेला आहे. याची तक्रार करण्यात आली असून चौकशीला सुरवात झालेली आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तलावातील गाळ उपासा सुरु आहे. हा गाळ पडीत असलेल्या जमिनीसाठी फारच उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे शासन हा गाळ शेतात वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देत असते. बहूभूधारक शेतकरी हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याची तरतूद सुद्धा आहे. हा गाळ केवळ शेतात वाहून नेला जावू शकतो. इत्तर कुठल्याही कामात या गाळाचा वापर करता येऊ शकत नाही, तसे आढळून आले तर शासन कार्यवाही करीत असते.

मात्र, गोंडपिपरी तालुक्यात हा गाळ व्यवसायासाठी वापरला जात असल्याची माहिती आहे. धाबा परिसरातील मंगलपेठ येथील तलावातील गाळ विकला गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. शासनाने गाळयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना पुढे आणली. मात्र चंद्रपूर जिल्हातील प्रशासनाने त्या योजनेलाच सुरुंग लावले आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा गाळ नेमका कोणत्या व्यावसायिकाच्या घशात गेला..? आणि गाळ खाऊ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कार्यवाही होते..?, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

*काम बंद, चौकशी सुरू*

मंगलपेठ येथील तलावातील गाळ काढून विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणातील तक्रार कार्यालयाकडे प्राप्त झाली असून, सद्यस्थितीत गाळ काढण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कार्यवाही अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे.

                 *इंजी. काकडे, अभियंता, सिंचाई उपविभाग, गोंडपिंपरी*

*”विहीर चोरीला गेली..!”ची आठवण*

     प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे संस्थापक असलेल्या नाम संस्थेकडून तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी या प्रसिद्ध अभिनेत्याने “जाऊ तिथं खाऊ” या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेली..?, प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरून सरकारला घाम फोडला होता. मात्र तलावातील गाळ विक्री करण्याचा प्रकार संस्थेकडील कर्मचारी आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडूनच करण्यात आला असल्याने, पुन्हा एकदा “विहीर चोरीला गेली”ची आठवण झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये