
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणघाट : दि. 3 जून 2026 रोजी गुजरातमधील जामनगर येथून डिझेल घेऊन येणारा NL01AJ0401 क्रमांकाचा मोठा टँकर वर्धा-जाम मार्गावर अपघातग्रस्त झाला. टँकरचा मागील बाजूचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच बोथुडा येथील पोलीस पाटील गोपाल किरपाल यांनी तात्काळ हिंगणघाट पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे, पोलीस कॉन्स्टेबल कुमरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व आवश्यक उपाययोजना केल्या.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकासह इतर कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.



