ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विनातिकीट प्रवासावरून एसटी बसमध्ये गोंधळ

महिला वाहकाला मारहाण, चालकास थापडा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दारूच्या नशेत प्रवाशाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 सिंदखेडराजा-देऊळगाव राजा मार्गावरील एसटी बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने महिला बस वाहक व चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना मंगळवारी, २ जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभदा पंढरीनाथ घुगे (वय ४१, रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगाव राजा) या एसटी महामंडळात बस वाहक म्हणून कार्यरत असून, त्या एसटी बस क्रमांक एमएच-०७ सी-९५०१ या सिंदखेडराजा ते देऊळगाव राजा मार्गावरील बसमध्ये कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी बस ग्राम पिंपळनेर शिवारातून जात असताना विकास भानदास शेरे (वय ३४, रा. बोराखेडी बावरा, ता. देऊळगाव राजा) हा प्रवासी दारूच्या नशेत विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी महिला वाहक सुभदा घुगे यांनी संबंधित प्रवाशास तिकीटाबाबत विचारणा केली असता, “मी तिकीट काढत नाही,” असे म्हणत आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने बसमधील वाहक व चालकासोबत हुज्जत घालत धक्काबुक्की व गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने महिला वाहकाचा उजवा हात पिरगळून त्यांना दुखापत केली. तसेच बस चालकाच्या तोंडावर चार ते पाच वेळा थपडा मारत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची व पाहून घेण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर जखमी महिला वाहक यांच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांसह संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २ जून रोजी दुपारी सुमारे २.१० वाजताच्या सुमारास सिंदखेडराजा-देऊळगाव राजा मार्गावरील ग्राम पिंपळनेर शिवारात घडली. सायंकाळी ५.३७ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये