देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजी-माजी आमदारांचे वर्चस्व कायम!
सभापतिपदी शंकरराव शिंगणे, उपसभापतिपदी भगवान खरात बिनविरोध!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बहुचर्चित देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी बिनविरोध पार पडली. सभापतीपदी शंकरराव शिंगणे, तर उपसभापतीपदी भगवान खरात यांची निवड झाली. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या परस्परविरोधी मानले जाणारे आमदार मनोज कायंदे आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या गटांमध्ये झालेल्या समन्वयामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगली आहे.
पश्चिम विदर्भातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एक असलेल्या देऊळगाव राजा बाजार समितीतील सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन सभापती समाधान शिंगणे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या निवडीबाबत राजकीय हालचालींना वेग आला होता.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभापतीपदासाठी शंकरराव शिंगणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. उपसभापती पदासाठी भगवान खरात आणि गणेश डोईफोडे यांनी अर्ज सादर केला होता; मात्र अर्ज माघारीच्या वेळी गणेश डोईफोडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भगवान खरात यांचीही बिनविरोध निवड झाली.
बाजार समितीतील सत्तावाटपाच्या या सूत्रात सभापतीपद डॉ. राजेंद्र शिंगणे समर्थक गटाकडे, तर उपसभापतीपद आमदार मनोज कायंदे समर्थक गटाकडे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवत शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील हिताच्या मुद्द्यांवर दोन्ही गटांनी समन्वय ठेवून सदर निवड केल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे



