येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पुतळ्याचा दुग्धाभिषेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार तथा गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व व्याख्यान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. येळकोट-येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाज विकासाच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्याला सामाजिक जोड देण्याच्या दृष्टिकोनातून पवणार येथे धाम नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता मोहीम ही ‘एक दिवस माझ्या समाजासाठी’ या ब्रीदवाक्याने राबविण्यात आली. जयंतीदिनी सकाळी ८.३० वा. गृहराज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी स्थानिक वंजारी चौक येथील अहिल्यादेवी स्मारक परिसरात स्वतः पुतळ्याचा दुग्धाभिषेक केला. यावेळी धनगर समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. धनगर समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी,अधिकाऱ्यांचा तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार सोहळा व त्यानंतर या कार्यक्रमात मार्च २०२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात सतीश महाराज देशमुख यांचे व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमात मुख्य अतिथी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते जयंत कावळे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके, डॉ. अनिल लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते . सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक वंजारी चौक येथून इंदिरा मार्केट, सोशालीस्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पावडे नर्सिंग होम ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक असे मार्गक्रमण करून मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पेहराव असलेले हुबेहूब अहिल्यादेवींचे चित्ररथ होते. लेझीम, भजन मंडळ तसेच शहरातील मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होते.



