चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील धोकादायक भेगा तातडीने दुरुस्त करा
नगरसेवक महेश जिवतोडे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील बाळासाहेब प्रवेशद्वार ते नवीन बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडून रस्ता खराब झाला असल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक महेश जिवतोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्त्याची दुरवस्था कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरील भेगांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक महेश जिवतोडे यांच्यासोबत नियोजन सभापती राहुलभाऊ सोनटक्के तसेच नगरसेवक संतोषभाऊ कुरेकार उपस्थित होते. संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



