भवानी ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपींना ४८ तासांत गजाआड
वर्धा पोलिसांच्या कामगिरीचे सोनार संघटनेकडून कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी ज्वेलर्स येथे झालेल्या घरफोडी व सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या वर्धा पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्धा जिल्हा सोनार संघटनेने विशेष सत्कार करून आभार व्यक्त केले आहेत.
२५ मे २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी ज्वेलर्स शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ६८ हजार ८५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तांत्रिक पुरावे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आरोपी नागपूरकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सलग ४८ तास पाठलाग करून नागपूर परिसरातून आरोपींना अटक केली. तसेच चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वर्धा जिल्हा सोनार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व स्थानिक गुन्हे शाखांचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
सोनार संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याने व्यापाऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या कारवाईमुळे वर्धा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून व्यापारी वर्गातून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



