वर्धा शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई
३ महिन्यांत ३ मकोका कारवाया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
वर्धा शहर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत आयुष पुरुषोत्तम बावरे या टोळीप्रमुखासह त्याचे साथीदार आकाश उर्फ डुडू पुरुषोत्तम परडेकर, कोहिनूर संजय उके आणि सौरभ उर्फ लल्ला राजेश यादव यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित टोळी 1999पासून शहर परिसरात सक्रिय असून मारहाण, खंडणी, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे तसेच इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
याचबरोबर दुसऱ्या एका कारवाईत आसिफ उर्फ मोट्या शौकत अली शेखयात हा टोळीप्रमुख आणि त्याचा साथीदार नोशाद अली शौकत अली शेखयात यांच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करून जबरदस्तीने पैसे उकळणे, मारहाण करणे, धमक्या देणे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा आरोप या टोळीवर आहे.
पोलिसांनी आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासून प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर मकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वर्धा शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले सिनुकुमार बानोत पोलिस उपनिरीक्षक वर्धा आणि शरद गायकवाड पोलिस उपनिरीक्षक वर्धा या पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



