भक्तिमय वातावरणात उद्या सोमवारी निघणार श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा पालखी
सायंकाळी ४ वाजता महाकाली मंदिरातून पालखीला प्रारंभ
चांदा ब्लास्ट
भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने सुरू असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची सांगता उद्या, सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी निघणार्या श्री माता महाकालीच्या भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने होणार आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप मातेच्या पालखीच्या दर्शनाने आणि भक्तिमय वातावरणात होणार असून, या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
श्री माता महाकाली मंदिरातून उद्या सायंकाळी ४ वाजता पालखीला प्रारंभ होईल. त्यानंतर गिरनार चौक, गांधी चौक आणि जयंत टॉकीज चौक मार्गे पालखी जटपुरा गेटला वळसा घालून कस्तुरबा मार्गाने पुन्हा श्री माता महाकाली मंदिरात पोहोचेल. या नगर प्रदक्षिणेदरम्यान शहरातील विविध भागांत मातेच्या पालखीचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
या नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात श्री माता महाकालीच्या उत्सवमूर्तीची व चांदीच्या पालखीची मिरवणूक, मातेच्या रथाचा सहभाग, गंगा आरती, पोतराज नृत्यसमूह, झांज-डमरू पथक, शिवतांडव-अघोरी नृत्य, पवनसुत प्रभू श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृश्य, वारकर्यांचा टाळ-मृदंग गजर आणि विविध देवी-देवतांची साकारलेली दृश्ये आकर्षण ठरणार आहेत.
यासोबतच विविध प्रकारची आदिवासी नृत्ये, अश्वावर आरूढ नवदुर्गेचे बोलके दृश्य, तुतारी व अष्टनगरीचा समावेश, मुलांचे लाठी, काठी, दानपट्टा, तलवार आणि भाला यांसारख्या शस्त्रांचे प्रात्यक्षिक, तसेच विविध सामाजिक संघटनांचे झाकी पथक या नगर प्रदक्षिणेची शोभा वाढवणार आहेत. शहरातील विविध व्यायामशाळा, प्रसिद्ध बँड पथके, कलशधारी महिला, लेझीम पथके, ढोल-ताशा व ध्वज पथके, डीजे धुमालांचे विविध संच, दांडिया-गरबा नृत्यसमूह आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरणही या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.
याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृश्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध देवी-देवतांची मंदिरे व पारंपरिक सण-उत्सवांचे देखावे, तंट्या भील व मानवी वेशभूषेवर आधारित सादरीकरणे, बंगाली समाजातील महिलांचे शंखनाद व पुरुषांचे डंकावादन, तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करणार्या सामाजिक संस्थांचा सहभाग या सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल.
पाच दिवसांच्या महोत्सवात धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध उपक्रमांनी चंद्रपूरचे वातावरण भक्तिमय झाले आहे. आता उद्याच्या नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने या महोत्सवाची सांगता होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री माता महाकाली महोत्सव समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.



