‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत राजुरात तालुकास्तरीय कार्यशाळा
आरोग्यदायी गावनिर्मितीचा संकल्प; आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे, आरोग्यविषयक सुविधांचा प्रभावी वापर व्हावा आणि गावागावांत आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा १४ ऑक्टोबर २०२६ रोजी राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली.
पंचायत समिती राजुरा येथे माननीय डॉ. भागवत रेजीवाड गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यशाळेची प्रस्तावना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांनी केली. यावेळी त्यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासंदर्भातील शासन निर्णय, अभियानाची उद्दिष्टे, समितीची कार्यपद्धती, निर्देशांक आणि गुणांकन याबाबत सविस्तर माहिती दिली. गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनीही अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आणि नागरिकांना आरोग्य सुविधांशी जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक जाधव, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय राजुरा, अनिरुद्ध शेंडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती राजुरा, आशीष शेख, विस्तार अधिकारी, संजय इनमुलवार, आरोग्य पर्यवेक्षक यांच्यासह तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, एलएचव्ही, आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.
याशिवाय गटप्रवर्तक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा कार्यकर्त्यांनीही कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक जितेंद्र चुधरी यांनी केले, तर डॉ. अक्षय बुलीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*गावांच्या आरोग्यविषयक विकासावर भर*
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागासह स्थानिक यंत्रणांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यशाळेमुळे अभियानाची उद्दिष्टे, निकष आणि कार्यपद्धती याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम राबवून ग्रामीण नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी समन्वित प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.



