धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांचे दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प, दीक्षाभूमीवर येणार्या अनुयायांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून विश्राम व्यवस्था.

चांदा ब्लास्ट
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी पवित्र दिक्षाभुमी येथे जात महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंर्त्य, बंधुता आणि न्यायाचा विचार समाजाला सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समताधिष्ठित आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. १6 ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेने देशातील सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाला नवी दिशा दिली. विषमता, अन्याय आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध संघर्ष करताना बाबासाहेबांनी मानवतावाद, समता आणि बंधुतेचा संदेश दिला. त्यांच्या या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दिक्षाभुमीच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपण कटिबध्द असून येथील विकास कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असून समाजाला अपेक्षित असा विकास आपण येथे करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कृषी कार्यालयाजवळ भव्य मंडप उभारून दूरवरून आलेल्या अनुयायांसाठी सुविधा
चंद्रपूर येथील दीक्षाभूमी वर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी विविध भागांतून लाखो अनुयायी दाखल होतात. मात्र, मोठ्या संख्येने येणार्या अनुयायांसाठी पुरेशी विश्राम व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अनेकदा गैरसोयींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन अनुयायांसाठी विश्राम व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने दीक्षाभूमी परिसरातील कृषी कार्यालयाजवळ भव्य मंडप उभारून दूरवरून आलेल्या अनुयायांसाठी विश्राम व्यवस्थेची सोय करण्यात आली. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणार्या अनुयायांना विश्रांतीसाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी आणि त्यांची गैरसोय कमी व्हावी, हा या व्यवस्था मागील उद्देश होता.
भाजप चंद्रपूर महानगरच्या वतीने पुरी-भाजीचे वाटप
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने पुरी-भाजीचे वाटप करण्यात आले. दूरवरून आलेल्या अनुयायांना भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.



