९ हजार ९९९ कन्यांचे पूजन आणि भोजन, श्री माता महाकाली महोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर
आ. जोरगेवार यांच्या पुढाकारातून धार्मिक परंपरेचे जतन, ४२ नवजात बालिकांना चांदीची नाणी भेट, गुजराती समाजाचा दांडिया आणि कबीर संस्कृती ग्रुपची जागरण गीते

चांदा ब्लास्ट
श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक परंपरांचा वारसा जपणार्या श्री माता महाकाली महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ हजार ९९९ कन्यांचे पूजन आणि भोजन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवात कन्यापूजनाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान आणि भारतीय धार्मिक परंपरेचे जतन करण्यात आले.
यावेळी विविध समाजांच्या वतीने माता महाकालीची आरती करण्यात आली. नवरात्रीच्या काळात जन्मलेल्या ४२ बालिकांना श्री माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने चांदीची नाणी भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच गुजराती समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दांडिया नृत्याने उत्सवात रंगत आणली, तर कबीर संस्कृती ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जागरण गीतांनी भक्तिमय वातावरण अधिकच भारावून टाकले.
नवरात्रोत्सवात कन्यापूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. कन्येमध्ये देवीचे स्वरूप पाहून तिचे पूजन करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत श्रद्धेने जपली जाते. याच श्रद्धेचे दर्शन श्री माता महाकाली महोत्सवात घडले. तब्बल ९ हजार ९९९ कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन देण्यात आले. या उपक्रमातून कन्येप्रती आदर, श्रद्धा आणि सन्मानाची भावना व्यक्त करण्यात आली. कन्यापूजन आणि भोजनासाठी उपस्थित झालेल्या बालिकांमुळे महोत्सव परिसरात आनंदाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून श्री माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्यासोबतच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कन्यापूजन आणि भोजनाचा हा कार्यक्रम महोत्सवातील प्रमुख धार्मिक उपक्रमांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आयोजित करण्यात येणार्या या कार्यक्रमातून देवीच्या आराधनेसह कन्येचा सन्मान करण्याचा संदेश दिला जातो. धार्मिक परंपरेला सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
४२ नवजात बालिकांना चांदीची नाणी भेट
नवरात्रीच्या पावन काळात जन्मलेल्या बालिकांचे स्वागत करत श्री माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने ४२ बालिकांना चांदीची नाणी भेट देण्यात आली. या उपक्रमातून नवजात कन्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासोबतच मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टिकोन जपण्याचा संदेश देण्यात आला. बालिकांच्या आगमनाचा आनंद आणि त्यांच्याप्रती असलेला स्नेह व्यक्त करणारा हा उपक्रम महोत्सवातील विशेष आकर्षण ठरला.
गुजराती समाजाच्या दांडियाने उत्सवात रंगत
श्री माता महाकाली महोत्सवात गुजराती समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमाने उत्सवात विशेष रंगत आणली. पारंपरिक दांडिया नृत्याच्या माध्यमातून गुजराती समाजाने आपल्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. दांडियाच्या तालावर रंगलेल्या या कार्यक्रमामुळे महोत्सवाच्या वातावरणात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. धार्मिक श्रद्धेसोबतच विविध समाजांच्या सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ मिळत असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
कबीर संस्कृती ग्रुपच्या जागरण गीतांनी भक्तिरसाची उधळण
कबीर संस्कृती ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जागरण गीतांनी महोत्सवातील भक्तिमय वातावरण अधिकच खुलविले. भक्तिपूर्ण गीतांच्या सादरीकरणातून माता महाकालीच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यात आली. जागरण गीतांच्या माध्यमातून भाविकांना भक्तिरसाचा अनुभव मिळाला. पारंपरिक धार्मिक गीतांच्या सादरीकरणामुळे महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले.



