ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या; सरसकट कर्जमाफी करा

भास्करभाऊ ताजने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्करभाऊ ताजने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, सरसकट कर्जमाफी, अखंडित वीजपुरवठा आणि आगामी हंगामासाठी बियाणे व खतांवर शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, पावसाअभावी शेतातील उभी पिके सुकत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. वर्षभर मेहनत करूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ताजने यांनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी सात प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असलेल्या शेतांना पिके वाचविण्यासाठी आवश्यकतेनुसार नियमित व अखंडित वीजपुरवठा करावा. दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याचे नमूद करत, प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेऊन भरीव आर्थिक मदत द्यावी. आगामी पीक हंगामासाठी बियाणे व खतांवर शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण कराव्यात, केवळ सौरऊर्जेवर अवलंबून न ठेवता शेतीच्या गरजेनुसार नियमित व विश्वासार्ह वीजपुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शिव-पाणंद व शेतरस्त्यांची निर्मिती करून अस्तित्वातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपण्याचे आवाहन

शेतकरी हा स्वाभिमानी असून आपल्या कष्टाच्या बळावर समाजाचे पोट भरणारा अन्नदाता आहे. त्यामुळे त्याला केवळ तुटपुंज्या मदतीऐवजी त्याच्या नुकसानीची भरपाई करणारे ठोस निर्णय आवश्यक आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे, त्यांचा स्वाभिमान जपणे आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे ताजने यांनी निवेदनात म्हटले आहे.

या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, असे आवाहन भास्करभाऊ ताजने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये