आयुर्वेदिक औषधे देण्यासाठी आलेल्या वैद्यराजाचा लॉजमध्ये मृत्यू : भद्रावतीतील घटना
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथे आयुर्वेदिक औषधे देण्यासाठी आलेल्या हरियाणा निवासी ५३ वर्षीय वैद्यराज दर्शनलाल साधूराम यांचा लॉजमध्ये मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, दर्शनलाल साधूराम हे नेहमीप्रमाणे आयुर्वेदिक औषधे देण्यासाठी भद्रावती येथे आले होते. दिवसभर रुग्णांना औषधे दिल्यानंतर रात्री जेवण करून ते लॉजमधील आपल्या खोलीत झोपले. मात्र, सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे पाठविण्यात आला आहे. मृताच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली असून, ते भद्रावतीकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली धनपाल तोडासे, भूषण चौधरी, प्रेमकुमार बावनकर आणि गोपाल आतकुलवार करीत आहेत.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



