ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामपंचायत निहाय पाणीटंचाईचे आराखडे तयार करून अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी

पाणीटंचाई व दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करा

चांदा ब्लास्ट

आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्याचा आढावा ; वैरण विकास योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्या

वर्धा : जिल्ह्यातील भूजलपातळी खालावत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई व दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारंजा, आर्वी व आष्टी तालुक्यांतील पाणीटंचाई व दुष्काळ निवारणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून तातडीने उपाययोजना कराव्यात. ग्रामपंचायत निहाय पाणीटंचाईचे आराखडे तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.

तहसिल कार्यालय आर्वी येथे कारंजा, आर्वी व आष्टी तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना संबंधित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे, ऐश्वर्या गिरी यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भूजल पातळी खालावल्यामुळे विहिरींमधील पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा किती काळ पुरेल, याचे नियोजन प्रत्येक गावाने आतापासूनच करणे आवश्यक आहे. पुढील जून महिन्यापर्यंतची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. केवळ नळदुरुस्तीची कामे पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट करण्याऐवजी विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, आडवे बोअर घेणे आणि पाण्याचे नवीन स्रोत विकसित करणे यासारख्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी यांनी दिल्या.

ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी गावपातळीवरील परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन उपलब्ध जलस्रोत, पाण्याची मागणी आणि संभाव्य टंचाई यांची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी. त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये आतापासूनच जनजागृती करावी. दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने जलयुक्त शिवार, वनराई बंधारे आणि चारा उपलब्धतेच्या नियोजनाला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टिल्लू पंपांचा वापर, जलवाहिन्यांमधील गळती आणि पाण्याचा अनावश्यक उपसा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी ठोस कार्यवाही करावी. पाणीटंचाई व दुष्काळ निवारणासाठी उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करून मंजूर कामे वेळेत पूर्ण करावीत. निधी उपलब्ध असूनही कामे प्रलंबित ठेवणे किंवा जबाबदारी टाळणे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यात आगामी काळात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षता घेता चारा लागवड तसेच वैरण विकास योजनेचे शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. ग्रामपातळीवर आवश्यक कामे करण्यात टाळाटाळ किंवा दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. काही प्रशासकीय अडचण असल्यास निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

*पाणी टंचाईचे दिर्घकालीन नियोजन करा: पराग सोमण*

पाणी टंचाईचे नियोजन करतांना दिर्घकालीन गावनिहाय नियोजन करा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनुसार व्हीबीजीरामजी योजनेची कामे तातडीने सुरू करा. शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहित करून जनजागृती करा. शासनस्तरावरून येणाऱ्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निहाय भेटी देवून पाणी टंचाईची वस्तूस्थिती सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये