ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोशी खुर्द तलावाचे पाणी नहराद्वारे पोंभुर्णा तालुक्यात आणा

भाजपा कार्यकर्ता अविनाश ढोंगे यांची मागणी; नहर व मोठ्या तलावाअभावी भातशेती संकटात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ तालुक्यात मोठ्या तलावांचा व सिंचन नहरांचा अभाव असल्याने भातशेती मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे भुशी खुर्द तलावातील पाणी नहराद्वारे पोंभुर्णा तालुक्यात आणून शेतकऱ्यांना सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपा कार्यकर्ता अविनाश ढोंगे यांनी केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिल्याने तसेच पावसाच्या अनिश्चिततेमुळे भातशेतीवर मोठा परिणाम झाला आहे. सिंचनाची ठोस व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे.

उमरी, पोतदार, सातारा, तुकूम, आंबेधाणोरा, घनोटी, कशाला, कट्टा, बोर्डा, झुलवार यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या तलावांचा व नहरांचा अभाव असल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास या भागातील शेतीला मोठा आधार मिळू शकतो.

घोशी खुर्द तलावातील उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करून नहराद्वारे पोंभुर्णा तालुक्यातील शेती क्षेत्राला पाणी उपलब्ध करून दिल्यास हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून भुशी खुर्द तलाव ते पोंभुर्णा तालुका नहर प्रकल्पाची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करावी, अशी मागणी अविनाश ढोंगे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना केवळ पावसावर अवलंबून न ठेवता कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये