ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्युत पोल उभारणीतील अनियमितता आणि वृक्षतोड प्रकरणाची चौकशी करा!

समाधान मिसाळ यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा ते खाल्याळ गव्हाण रस्त्यालगत सुरू असलेल्या विद्युत पोल उभारणीच्या कामाची गुणवत्ता, नागरिकांची सुरक्षितता आणि वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान दिलीप मिसाळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळातील मुख्य अभियंत्यांना तक्रार निवेदन सादर केले असून, मुख्य कार्यकारी अभियंता, अकोला आणि मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांनाही निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.

वारंवार तक्रारी करूनही कारवाई नसल्याचा आरोप

देऊळगाव राजा ते खाल्याळ गव्हाण रस्त्यालगत महावितरण कंपनीमार्फत विद्युत पोल उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत, पोलच्या जागेबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे मिसाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या कामादरम्यान झालेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, देऊळगाव राजा येथील महावितरणचे संबंधित उपकार्यकारी अभियंता कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अधिकारी आणि कंत्राटदाराच्या भूमिकेची चौकशी करा

संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून यापूर्वीच्या तक्रारींवर कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा लेखी खुलासा घेण्यात यावा. चौकशीत संगनमत किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.

तसेच विद्युत पोल उभारणीच्या कामाची वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि संबंधित नियमांचे पालन यांची तपासणी करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

वृक्षतोड प्रकरणात पुन्हा वृक्षारोपण करण्याची मागणी

विद्युत पोल उभारणीच्या कामादरम्यान झालेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाची चौकशी करून तोडण्यात आलेल्या झाडांच्या प्रमाणानुसार नियमानुसार पुन्हा वृक्षारोपण करून घेण्यात यावे, अशी ठाम मागणी मिसाळ यांनी केली आहे.

नव्याने लावलेल्या झाडांचे संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याची मागणी

या प्रकरणात आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारी, करण्यात आलेली चौकशी आणि घेतलेल्या निर्णयांची पडताळणी करून सविस्तर लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, अधीक्षक अभियंता बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा, उपवनसंरक्षक बुलढाणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बुलढाणा, तसेच मुख्य कार्यकारी अभियंता अकोला आणि मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनाही देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांकडे पुढील तक्रार करण्यात येईल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते समाधान दिलीप मिसाळ यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये