महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे झूम व्हिडिओ कॉलद्वारे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राज्यभर संघटन मजबुतीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांत रुजविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सोशल मीडिया विभागाच्या तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे एकदिवसीय प्रशिक्षण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात, टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या मार्गदर्शनात, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आशुतोष शिर्के, प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२६ मे) संपन्न झाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय दौरे करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. त्या अहवालाच्या आधारे तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीने सादर केलेल्या प्रस्तावाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिल्यानंतर राजेश संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविणे, युवकांना संघटित करणे तसेच पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी “सोशल मीडिया” हे प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियातील विविध प्रकारच्या तंत्रांचा योग्य अभ्यास करून जनसामान्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांत रुजविण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरीव कार्य कराल, तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावीपणे उभी कराल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी सोशल मीडिया विभागाचा कृतीशील कार्यक्रम, डॉ. निमिष साने यांनी संवादात्मक शैली, ज्येष्ठ पत्रकार दीपक लोखंडे यांनी सोशल मीडियाचे बारकावे, प्रवक्ते हनुमंत पवार आणि संग्राम खोपडे यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले.
सोशल मीडियाच्या या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरुबिंदर बच्चर यांची विशेष उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुकाध्यक्ष राजेश डोंगरे, कोरपना तालुकाध्यक्ष रोशन आस्वले, कार्याध्यक्ष विवेक येरणे यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.



