आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न
सलोखा व शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आगामी २७ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र ‘बकरी ईद’ (ईद-उल-अजहा) सण साजरा होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सर्व समाजघटकांमध्ये धार्मिक सलोखा व शांतता कायम राहावी या उद्देशाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ‘जिल्हा शांतता कमिटी’ची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील विविध मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील पोलिस स्टेशन चे ठाणेदार व्ही. सी द्वारे सदर बैठकीला हजर होते.
बकरी ईदचा सण नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात, शांततेत आणि सर्वधर्मसमभावाच्या भावनेने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजकंटकांना थारा देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. कुर्बानीच्या वेळी शासनाने आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही आणि स्वच्छतेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम इत्यादी) आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही पोस्ट, मेसेज अथवा व्हिडिओ टाकू नये. पोलीस सायबर सेलचे यावर बारीक लक्ष असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
सणाच्या दिवशी शहरात आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
वर्धा जिल्ह्याला नेहमीच शांतता आणि सलोख्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. आगामी बकरी ईदचा सण देखील सर्वांनी एकत्रित येऊन, एकमेकांच्या भावनांचा आदर करत शांततेत साजरा करावा. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे.



