ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमधील शासकीय रुग्णालयामागील प्रमुख रस्ता दयनीय अवस्थेत; जीवघेणे खड्डे, उघडी गटारे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त

प्रशासन व कंपनीकडे तातडीच्या कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट

घुग्घूस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ आणि ५ यांना जोडणारा शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूने तसेच डोर रुग्णालयासमोरून जाणारा प्रमुख सिमेंट रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. एकेकाळी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा रस्ता आता मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांनी व्यापला असून पादचारी आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका कायम निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या उघड्या गटारांतून सतत सांडपाणी वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. अनेक वेळा दुचाकीस्वारांचा तोल जाऊन तसेच पादचारी गटारात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आजपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत किंवा गटारांच्या व्यवस्थेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

विशेष म्हणजे, हा रस्ता प्रभाग क्रमांक ४ आणि ५ यांना जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग असून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वाहतुकीसाठीही प्रमुख मार्ग मानला जातो. या मार्गावर कंपनीच्या जड वाहनांची दिवसभर वर्दळ असते तसेच सुरक्षा रक्षकही तैनात असतात. असे असूनही कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून या रस्त्याच्या दुरुस्ती किंवा मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कोणतीही पुढाकार घेण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, दोन्ही प्रभागांचे लोकप्रतिनिधी विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करतात; मात्र या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था आजही कायम आहे. त्यामुळे विकासाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

परिसरातील नागरिकांनी शासन, प्रशासन, नगर परिषद तसेच लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी संयुक्तपणे या रस्त्याचे तातडीने पुनर्बांधकाम करावे, जुन्या सिमेंट रस्त्याऐवजी मजबूत दर्जेदार रस्ता तयार करावा, दोन्ही बाजूंना भूमिगत गटारांची उभारणी करावी तसेच रस्त्यालगत साचलेला कचरा तातडीने हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर करावा, अशी मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांचे मत आहे की, या रस्त्याची वेळेत दुरुस्ती व आवश्यक विकासकामे न झाल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता शासन-प्रशासन, नगर परिषद आणि संबंधित कंपनी नागरिकांच्या या गंभीर मागणीची कितपत दखल घेऊन किती लवकर कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये