खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – भाजपा तालुकाध्यक्षांचे पत्रकार परिषदेत सुतोवाच
आम्ही कुणीही राजीनामा दिलेला नाही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार - राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुकाध्यक्षांचे प्रतिपादन
विरोधकांचा कुटिल डाव अपयशी; राजुरा मतदारसंघात भाजप ‘एकसंघ’चं!
आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर सर्व अध्यक्षांचा ठाम विश्वास. तालुकाध्यक्षांचे ‘सामूहिक राजीनामे’ या फेकन्युजचे भाजपकडून खंडण.
राजुरा, दि. १० जूलै
राजुरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या चार मंडळ अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे दिल्याची सोशल मीडियावर फिरणारी बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि नागरिकांची दिशाभूल करणारी आहे. आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि भाजपच्या भक्कम संघटनशक्तीमुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी रचलेला हा एक निष्फळ राजकीय कट आहे, अशी अधिकृत आणि रोखठोक स्पष्टोक्ती राजुरा विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या सर्व तालुका व शहर मंडळ अध्यक्षांनी संयुक्त पत्र परिषदेत दिली असून या संदर्भात राजुरा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘सत्ताधारी पक्षातील अध्यक्षांचे सामूहिक राजीनामे अशा आशयाचे जाणीवपूर्वक पसरवले जाणारे वृत्त फेटाळून लावत भाजपचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते आणि जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड यांनी या वृत्ताचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारांशी बांधील असणारी घट्ट कुटुंबव्यवस्था आहे, हे सांगताना पदाधिकाऱ्यांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या यशस्वी व संघटनात्मक बांधणीचा आजवरचा सविस्तर कार्यावलोकन सादर केला. आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या सक्षम, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली संपूर्ण राजुरा विधानसभा मतदारसंघात लोकाभिमुख विकासकामांचा झंझावात सुरू आहे. पायाभूत विकासासह बहुप्रलंबीत विकासकामे त्यांनी वेगाने मार्गी लावली आहेत. केवळ विकासकामेच नव्हे, तर आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे भारतीय जनता पक्षाने केंद्र व राज्य पातळीवरून वेळोवेळी दिलेले सर्व संघटनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे राबवून राजुरा विधानसभा मतदारसंघ प्रदेश स्तरावर अग्रस्थानी पोहचत आहे. एका बाजूला आमदारांचा थेट जनतेशी असलेला संपर्क आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे राजुरा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस सामान्य नागरिकांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ होत चालला आहे. विकासाचा झंजावात व संघटनात्मक बांधणीत भाजपचा वाढता आलेख पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, काही खुज्या प्रवृत्तीच्या व्यक्ती पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी अशा खोट्या बातम्यांचा केविलवाणा आधार घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षात प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखला जातो. आम्ही सर्व अध्यक्ष आणि कार्यकर्ते पूर्णपणे समाधानी, एकजूट आणि पक्षाशी प्रामाणिक आहोत. त्यामुळे सामूहिक राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिक जोमाने एकत्र काम करत राहू. अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.
फेकन्युजवर विश्वास ठेवू नये, भाजप अध्यक्षांचे आवाहन.
सोशल मोडियाच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर नागरिकांनी आणि कार्यकत्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत भाजप कार्यालयाच्या किंवा अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही बातमीला सत्य मानू नये. आमचे नेते, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या सक्षम व सेवाभावी नेतृत्वात ‘विकसित व संघटनशील राजुरा विधानसभा’ करण्यासाठी भाजपचे संघटन भविष्यातही अधिक जोमाने व सक्षमपणे जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील, असा ठाम विश्वास सर्व मंडळ अध्यक्षांनी व्यक्त केला.
या पत्रपरिषदेला भाजपचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, भाजपाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, अमोल आसेकर, राजेश राठोड, नगरसेवक प्रफुल कावळे, शितील लोणारे, प्रदीप बोबडे, रवींद्र आत्राम आदी उपस्थित होते.



