सूरज पांडेचे नगरसेवक पद काढून कठोर कारवाई करावी
काँग्रेसची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील भाजपचे नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विवाहित महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित नगरसेवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विनयभंग, घरात घुसखोरी, अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच संबंधित नगरसेवक यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. प्रकाश निमजे यांना मारहाण करणे, निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे आरोप यापूर्वीही त्यांच्यावर झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी हा समाजासाठी आदर्श असावा, अशी जनतेची अपेक्षा असते. मात्र गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा कमी होत असून, पदाचा धाक दाखवून महिलांना धमकावणे, सभ्य नागरिकांना मारहाण करणे व सत्तेचा गैरवापर करणे अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.
देशात व राज्यात महिलांवरील अत्याचार, गैरवर्तन, दडपशाही आणि सत्तेच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्याचे सांगत अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेला न्याय मिळावा, तिला आवश्यक संरक्षण द्यावे, सुरज पांडे यांचे नगरसेवक पद काढून घेण्यात यावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजय मेंढी, गटनेत्या प्रणिता उपाध्ये, सभापती तुषार बावणे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, नगरसेवक एहजाज अहमद, चेतन शेंडे, शैलेश लोखंडे, विवेक येरणे, पीडित महिला तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



