ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांवरील प्रशासकीय ताण कमी करा

शेतकऱ्यांना २४ तास वीज द्या ; आमदार मनोज कायंदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सिंदखेडराजा मतदारसंघासह राज्यातील शिक्षकांवरील अतिरिक्त प्रशासकीय कामाचा ताण कमी करावा आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी बुधवारी (दि. ८) विधानसभेत केली. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेमुळे शिक्षकांवर पडत असलेल्या अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात ठळकपणे मांडला.

राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येत असून, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शिक्षकांना अध्यापनाबरोबरच निवडणूकसंबंधित कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शाळांमधील नियमित अध्यापन विस्कळीत होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे आमदार कायंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

शिक्षकांवर आधीच विविध शासकीय व प्रशासकीय कामांचा मोठा भार असताना SIR प्रक्रियेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण तातडीने कमी करावा, तसेच शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राहील यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

याचबरोबर, सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यभरातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत असल्याचे सांगत आमदार कायंदे यांनी शेतीसाठी अखंड वीजपुरवठ्याचा प्रश्नही सभागृहात उपस्थित केला. खरीप हंगामात कपाशी, सोयाबीनसह विविध पिकांची लागवड झालेली असताना पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. मात्र अनेक भागांत अपुरा व खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंड वीजपुरवठा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली.

आमदार कायंदे यांनी सभागृहात मांडलेल्या या दोन्ही मागण्या थेट शिक्षक, विद्यार्थी आणि शेतकरी या तिन्ही घटकांशी निगडित असल्याने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्थानिक स्तरावरूनही मत व्यक्त होत आहे.

“राज्यात सुरू असलेल्या SIR-2026 प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत आहे. शिक्षकांना अध्यापनाऐवजी प्रशासकीय कामांत गुंतवले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करावा. त्याचबरोबर, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंड वीजपुरवठा मिळणे अत्यावश्यक आहे. सिंदखेडराजा मतदारसंघासह राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हा प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडला असून शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”अशी मागणी

— आमदार मनोज कायंदे, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये