ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचे राज्यातील पहिले प्रशिक्षण बिबी येथे संपन्न
सरपंचांनी केला गाव प्लास्टिक मुक्तीचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण २ अंतर्गत पिरामल फाउंडेशन तथा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ या विषयावरील जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा पंचायत लर्निंग सेंटर, जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथे उत्साहात पार पडली. ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट विषयावरील राज्यातील हे पहिले प्रशिक्षण असल्याने या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, सिनियर प्रोग्राम मॅनेजर हरीश पटेल (अहमदाबाद), सिनियर प्रोग्राम मॅनेजर आशुतोष व्यास (जयपूर), प्रोग्राम लीडर गीता वेणुगोपाल, प्रोग्राम मॅनेजर दीपक कलंकर (पिरामल फाउंडेशन, संभाजीनगर), प्रोग्राम लीडर रवींद्र बागुल (पिरामल फाउंडेशन, मुंबई), प्रोग्राम लीडर दृष्टी सहाय (पिरामल फाउंडेशन), गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, जिल्हा परिषद अधिकारी कृष्णकांत खानझोडे, जिल्हा परिषद अधिकारी संजय धोटे, सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, पंचायत विस्तार अधिकारी पंढरी गेडाम, पंचायत विस्तार अधिकारी दादाराव पवार तसेच ग्रामपंचायत अधिकारी संगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेस कोरपना व जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत बिबी येथील स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, पुनर्वापर, नेतृत्व विकास आणि ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथील प्लास्टिक वेस्ट प्रोसेसिंग युनिटला प्रत्यक्ष भेट देण्यात आली. यावेळी प्लास्टिक युनिटचे संचालक जिलानी खाटीक यांनी युनिटची कार्यपद्धती, प्लास्टिक प्रक्रिया करण्याची संपूर्ण साखळी, यंत्रसामग्रीचा वापर व प्लास्टिक कचऱ्यापासून मूल्यनिर्मितीची प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रोग्राम मॅनेजर दीपक कलंकर यांनी केले.
ग्रामीण भागात प्लास्टिक कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त गावांच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट विषयावरील राज्यातील हे पहिले प्रशिक्षण असल्याने उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष स्वागत केले.
२०२३ मध्ये जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथे कोरपना व जिवती तालुक्यासाठी प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटच्या माध्यमातून गावागावातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रत्येक सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतीतील प्लास्टिक कचरा नियमितपणे या युनिटपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक गावांची निर्मिती निश्चितच शक्य होईल. हे प्रशिक्षण त्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
— प्रा. आशिष देरकर, उपसरपंच, जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी



