ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“ढगा राहाटी जंगलात राणी पार्वती वाघिणीचे नवे साम्राज्य

तीन बछड्यांना शिकवतेय जिवंत शिकारीचे धडे”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : बोर व्याघ्र जंगलातील शिकारीचा थरार प्रत्यक्ष अनुभवणे हे वन्यजीवप्रेमींसाठी नेहमीच रोमांचक ठरते. ढगा राहाटी परिसरातील जंगलात सध्या एका वाघिणीने आपल्या तीन बछड्यांसह नवे अधिराज्य निर्माण केले असून, ती त्यांना प्रत्यक्ष शिकारीचे धडे देताना दिसत आहे. त्यामुळे हा परिसर वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात ‘कॅटरिना’ नावाने ओळखली जाणारी वाघीण आपल्या बछड्यांसह मुक्त संचार करत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे आणि बछड्यांचे दर्शन पर्यटकांना घडल्याने जंगल सफारीला अधिक आकर्षण प्राप्त झाले आहे. रहाटी प्रवेशद्वार परिसरातील जंगलात वाघांच्या हालचाली वाढल्याने या भागाला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.

वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाघीण आपल्या सुमारे सात महिन्यांच्या तीन बछड्यांना शिकारीचे प्रशिक्षण देत आहे. जंगलात चरणाऱ्या नीलगायीवर हल्ला करण्यासाठी ती आणि तिचे बछडे दबा धरून बसल्याचे दृश्य वन कर्मचाऱ्यांनी पाहिले. सुरुवातीला वाघीण सावजाला वेढा घालण्याचे तंत्र शिकवत होती, तर बछडे तिच्या प्रत्येक हालचालीचे अनुकरण करत होते.

नीलगाय सुटण्याचा प्रयत्न करत असतानाही वाघीण सातत्याने तिचा पाठलाग करत होती. बछडेही आईच्या मदतीला धावत होते. काही वेळाने वन विभागाच्या वाहनाचा आवाज झाल्याने नीलगायीला संधी मिळाली आणि ती पसार झाली. मात्र, वाघीण आणि बछड्यांनी दाखवलेले समन्वयपूर्ण शिकारीचे कौशल्य पाहून वन कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

धगाई जंगल परिसरात वाघांचा वाढता वावर आणि बछड्यांचे प्रशिक्षण हे वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. जंगलातील अन्नसाखळी आणि नैसर्गिक जीवनचक्र प्रत्यक्ष पाहण्याची दुर्मिळ संधी या निमित्ताने पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये