ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक डेंग्यू दिन’ साजरा

पावसापूर्वी राज्य सरकारची आरोग्य जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           आरोग्य विभागाच्या वतीने दि.१५ रोजी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे ‘जागतिक डेंग्यू दिन’ विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डेंग्यू आजाराबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, रोगाची लक्षणे, निदान व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, ग्रामीण रुग्णालय भद्रावतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिषकुमार सिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन सातभाई, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक सुनिल जोशी, किटकजन्य आजार सल्लागार मनिभूषण धनवार, तालुका पर्यवेक्षक अंकुश पंडीले आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ नेहा आंबेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनीया पेटकर यांनी केले. आरोग्य सेवक मनोज कायरकर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश साठे यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्हा डेंग्यूच्या दृष्टीने संवेदनशील असून पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग — पाणी साठे तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा” हे यंदाचे घोषवाक्य असून प्रत्येक नागरिकाने घर व परिसर स्वच्छ ठेवून डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

डेंग्यू हा ‘एडिस इजिप्ती’ या डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार असून स्वच्छ व साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. अचानक ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, मळमळ व उलटी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गंभीर लक्षणे दिसल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

डेंग्यूपासून बचावासाठी घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी व फुलदाण्या नियमित स्वच्छ करणे, दारे-खिडक्यांना जाळ्या लावणे, अंगभर कपडे वापरणे व मच्छरप्रतिबंधक साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

जनसहकार्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी धोका अद्याप कायम असल्याने सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये