ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरटीओ ई-चालनच्या बनावट मेसेजने युवकाची फसवणूक

व्हॉट्सॲप हॅक करून खात्यातून १ लाख ९४ हजार ७००रुपये लंपास

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          शहरातील एका युवकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून बनावट आरटीओ ई-चालनच्या नावाने पाठविण्यात आलेल्या ए पी के फाइलमुळे त्याचे व्हॉट्सॲप हॅक करून बँक खात्यातील तब्बल १ लाख ९४हजार ७oo रुपये लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इम्रान खान (वय ३४, रा. इंदिरा नगर, भद्रावती) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मे रोजी त्यांच्या व्हॉट्सॲपवर “आरटीओ ई-चालन” संदर्भातील एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये एक ए पी के फाइल पाठविण्यात आली होती. संबंधित फाइल अधिकृत असल्याचे समजून इम्रान खान यांनी ती डाउनलोड केली.

फाइल डाउनलोड करताच त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून आपोआप विविध मेसेज पाठविले जाऊ लागले. काही वेळातच त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून आयएमपीएसद्वारे दोन वेगवेगळे व्यवहार करण्यात आले. त्यामध्ये १ लाख ९० हजार रुपये तसेच ४हजार ७oo रुपये असे एकूण १ लाख ९४ हजार ७०० रुपये बँक ऑफ बडोदा खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच इम्रान खान यांनी तातडीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी बनावट ई-चालन, कुरिअर, केवायसी अपडेट किंवा बँक संदर्भातील ए पी के फाइल्स पाठवत असल्याचे समोर येत आहे.

सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना अनोळखी लिंक, ए पी केफाइल किंवा संशयास्पद मेसेज डाउनलोड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारचा मेसेज आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये