विकासकामांचे नियोजन करा, देवस्थानांमध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा ; फिल्डवर भेट देऊन कामांची पाहणी करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : कोणत्याही देवस्थानाचा विकास करताना केवळ निधी मिळवणे महत्त्वाचे नसून, तिथे येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. प्रत्येक देवस्थानात शौचालय आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्याने असली पाहिजे. विश्वस्तांनी केवळ शासनावर अवलंबून न राहता मंदिरांचा टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विकासाचा एक निश्चित प्लॅन तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सन 2024-25 व 2025-26 वर्षात यात्रा स्थळांच्या मंजूर विकास कामांचा आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, माजी खासदार सुरेश वाघमारे, कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
शासकीय अधिकारी किंवा कंत्राटदार काम करत असताना विश्वस्तांनी कामाच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवावे. काम निकृष्ट दर्जाचे असल्यास ते थांबवून तक्रार करावी. देवस्थानाच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन असणे आवश्यक असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्प्यात कोणती कामे करायची याचा स्पष्ट आराखडा तयार ठेवावा. आगामी विकासकामांसाठी निधी हवा असल्यास जिल्हा नियोजन समितीमधून तात्काळ निधी मंजूर केला जाईल. स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन आराखडे सादर करावे. अचूक नियोजन असल्यास निधीचा योग्य विनियोग करता येईल, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या पुढाकारामुळेच अनेक धार्मिक स्थळांची सुरुवात होते आणि पुढे त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळतो. शासन म्हणून आम्ही निधी स्वरूपात हातभार लावतोच, पण देवस्थानच्या विश्वस्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी वॉटर कुलर लावले जातात, पण त्याच्या बाजूला अस्वच्छता निर्माण होते. वॉटर कुलर परिसर आणि ग्लासेसची नियमित स्वच्छता विश्वस्तांनी राखली पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आमदार राजेश बकाने म्हणाले, पावसाळा तोंडावर असल्याने जिथे नागरिकांना अडचण येऊ शकते, अशी रस्ते आणि पुलांची कामे या महिनाभरात पूर्ण करण्यात यावीत. समोरची डीपीसी येईपर्यंत मागील डीपीसीची कामे पूर्णत्वास जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्याची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी देखील काही विषय मांडले.
जिल्ह्यात ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत सभागृह बांधकाम, विद्युतीकरण, सौंदर्यीकरण पेव्हर ब्लॉक, रस्ता, संरक्षण भिंत, सौर ऊर्जा आदी कामे मोठ्या प्रमणात करण्यात येत आहेत. या बैठकीत प्रलंबित डीपीसी कामे, रस्ते व पूल बांधकाम तसेच देवस्थानांच्या मूलभूत सुविधांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.



