ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मा. आयुक्तांची ‘अमृत 2.0 चंद्रपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना’ व इरई धरण परिसराला भेट

 चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत 2.0 चंद्रपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची मा. आयुक्त यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी योजनेच्या विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेऊन कामांचा दर्जा, गुणवत्ता तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC), कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच अभियंते उपस्थित होते. मा. आयुक्तांनी जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, पंपिंग स्टेशन, मुख्य जलवाहिन्या, वितरण जलवाहिन्या तसेच इतर पाणीपुरवठा पायाभूत सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रत्यक्ष प्रगतीची माहिती घेतली. तसेच कामांचा दर्जा कायम राखून नियोजनबद्ध व गतीने कामे पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.

त्यानंतर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मा. आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत इरई धरण परिसराची संयुक्त पाहणी केली. संभाव्य कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर धरणातील उपलब्ध जलसाठा, आगामी पाणी उपलब्धता तसेच शहरासाठी आवश्यक जलनियोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच उपलब्ध जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करून शहराचा पाणीपुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

पाहणीदरम्यान मा. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्याच्या, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवून कामांना गती देण्याच्या तसेच नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल याची दक्षता घेत प्रकल्पाची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये