मनपाची सर्वसाधारण सभा रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
आयुक्त व महापौरांच्या दालनासमोर घोषणाबाजी; सभा पूर्ववत घेण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महानगरपालिकेची ३ जुलै रोजी नियोजित सर्वसाधारण सभा अचानक रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त नरेश अनुकुरी आणि महापौर संगीता खांडेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी हिरावून घेणारा हा निर्णय तात्काळ मागे घेऊन नियोजित सर्वसाधारण सभा पूर्ववत घेण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी भाजप गटनेते शेखर शेट्टी यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मनपा प्रशासनाने घेतलेला निर्णय हा लोकशाहीविरोधी व बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. आंदोलनानंतर आयुक्तांना निवेदन सादर करून सर्वसाधारण सभा पूर्ववत घेण्याची मागणी करण्यात आली.
शेखर शेट्टी यांनी निवेदनात नमूद केले की, ३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात शहराच्या विकासाशी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समाविष्ट होते. मात्र, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेता पदासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत संपूर्ण सभा रद्द करण्यात आली. प्रत्यक्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केवळ अजेंड्यातील विषय क्रमांक २२ वरच स्थगिती दिली असून, इतर कोणत्याही विषयावर किंवा इतर पक्षांच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अपक्ष सदस्यांच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया नियमानुसार पार पडू शकत होती. अशा परिस्थितीत संपूर्ण सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय कायद्याच्या तरतुदींना धरून नसून तो एकतर्फी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेट्टी यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एकदा बोलावलेली सर्वसाधारण सभा काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकत नसल्यास ती पुढे ढकलता येते; मात्र संपूर्णपणे रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय निवडणूक प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असून, तो लोकशाही मूल्यांना धक्का देणारा आहे.
सर्वसाधारण सभा ही केवळ राजकीय नियुक्त्यांसाठी नसून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. न्यायालयाने केवळ एका विषयाला स्थगिती दिली असताना उर्वरित सर्व जनहिताचे विषय बाजूला ठेवून संपूर्ण सभाच रद्द करणे म्हणजे चंद्रपूरच्या नागरिकांच्या हितावर गदा आणणारे असून लोकशाही प्रक्रियेचाही अवमान असल्याची टीका त्यांनी केली.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच रद्द करण्यात आलेली सर्वसाधारण सभा तातडीने पूर्ववत घेऊन शहरातील प्रलंबित विकासकामे व जनहिताचे विषय मार्गी लावावेत, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.
या ठिय्या आंदोलनात भाजपचे गटनेते शेखर शेट्टी यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक श्री. सुभाष दिनकरराव कासनगोटूवार, सौ. सरला प्रतीक कुलसंगे (गेडाम),श्रीमती शीतल रविंद्र गुरनुले ,श्रीमती अनुजा सतीश तायडे,श्री. नितेश दत्ता गवळे, श्री. जितेश देवानंद कुळमेथे,श्रीमती आशा चंद्रशेखर देशमुख, श्रीमती अॅड. सारिका सचिन संदुरकर,श्री. रॉबीन सुधांशु बिस्वास, श्रीमती पुष्पा संजय उराडे, सौ. राजलक्ष्मी सुधीर कारंगल,श्रीमती सविता राहुल कांबळे,श्री. संजय नारायण कंचलांवार, श्रीमती ज्योती धनराज जिवने, श्री भालचंद्र दानव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



