चंद्रपूरात उद्या भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन..
आ. किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), सामान्य रुग्णालय चंद्रपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार, १७ मे रोजी भव्य “सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बायपास रोडवरील के.जी.एन. कॉन्व्हेंट येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
या शिबिरात मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मोतीबिंदू, हर्निया, मूळव्याध, पोटाचे आजार, महिलांचे आजार, बालरोग, सांधेदुखी, त्वचारोग आदी विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत.
शिबिरात भरती होणार्या रुग्णांवर हायड्रोसिल, हर्निया, पोटातील गाठी, गर्भपिशवीचे ऑपरेशन, मोतीबिंदू तसेच इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरात नोंदणी करणार्या रुग्णांची आवश्यक तपासणी, एक्स-रे, रक्त व लघवी चाचणी, सोनोग्राफी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. भरती रुग्णांसाठी रुग्णालयात ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था देखील मोफत उपलब्ध राहणार आहे.



