अबब..! चक्क पांदण रस्त्यावरून बेकायदेशीर जड रेतीची वाहतूक
नवेगाव (वाघाडे) येथील प्रकार ; वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र शासनाच्या गावविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी शेतकऱ्यांच्या हितासाठी गावशीवारात पांदण रस्ते तयार करण्यात आले. ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या गावापासून तर थेट शेतापर्यंत जाण्याकरिता होतो आहे. मात्र तालुक्यातील नवेगाव (वाघाडे) या गावातील पांदण रस्त्यावरून बेकायदेशीरपणे चक्क जड रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याने, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून ही रेतीची वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कोरंबीच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनातील सविस्तर वृत्तात असा की, नवेगाव वाघाडे ते विठ्ठलवाडा या पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सदर पांदण रस्ता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून बनविण्यात आला असून, हा केवळ शेती कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या वापरासाठी आहे. मात्र आजघडीला या पांदण रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवजड वाहने धावत आहेत. या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील सिमेंटचे भोंगे फुटलेले आहेत.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, शेती हंगामासाठी शेतकऱ्यांना याच पांदण रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून त्याचा फटका शेतीच्या उत्पन्नवाढीवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अशा या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून तात्काळ कारवाई करण्याकरिता ग्रामपंचायत कोरंबीच्या वतीने आज (१५ मे) रोजी उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी तसेच तहसीलदार गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनकर्त्यांमधे सरपंच/प्रशासक रमेश बारसागडे, उपसरपंच मीना शेंडे, सदस्य नितेश मेश्राम, श्रावण शेंडे, तृप्ती चुनारकर, जीवनकला चणेकर, भाऊजी चणेकर यांची उपस्थिती होती.



