भिवगावात शेतीच्या कारणावरून वाद
महिलेला शिवीगाळ व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा: : तालुक्यातील भिवगाव येथे शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुनिता रामेश्वर लोंढे (वय २८, व्यवसाय शेती, रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाळासाहेब कीसन लोंढे, केशव कीसन लोंढे, वैभव बाळासाहेब लोंढे, भागवत बाळासाहेब लोंढे, कीसन भानुदास लोंढे व जमुनाबाई बाळासाहेब लोंढे, सर्व रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ मे २०२६ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास भिवगाव शिवारात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये शेतीचा वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ व २ हे फिर्यादीच्या शेतातील डीपीजवळ काहीतरी करत असताना फिर्यादी यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच खाली पडलेला फ्यूज फेकून मारल्याने तो फिर्यादीच्या हाताच्या करंगळीला लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपी फिर्यादीच्या घराजवळ जमा झाले व “तुम्ही कुठे जाता?” असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप. क्रमांक २१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १२५(अ), ३५१(२), ३५१(३) व ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद पोहेकाे संजय गोरे यांनी केली असून पुढील तपासही तेच करीत आहेत.



