ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मच्छीव्यवसाय करणाऱ्या वडिलांच्या मुलाची दहावीत गगनभरारी

साहिल मंडरे ठरला तालुक्याचा "स्टार आयकॉन"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील शिवाजी हायस्कुलचा विद्यार्थी साहिल सुरेश मंडरे याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तब्बल ९३.४० टक्के गुण संपादन करत शाळेत प्रथम तर संपूर्ण गोंडपिपरी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्वल केले आहे. साहिलच्या या उल्लेखनीय यशामुळे विठ्ठलवाडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत साध्या आणि मेहनती कुटुंबातील साहिलने हे यश आपल्या अथक परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळवले आहे. त्याचे वडील सुरेश मंडरे हे मच्छीव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी असून घरची जबाबदारी सांभाळतात. आर्थिक परिस्थिती साधी असतानाही आपल्या मुलाने मोठे व्हावे, शिक्षणाच्या माध्यमातून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी आई-वडिलांनी सतत प्रोत्साहन दिले. त्याच प्रेरणेतून साहिलने अभ्यासात सातत्य ठेवत हे नेत्रदीपक यश संपादन केले.

साहिल हा स्वभावाने अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शाळेत नियमित उपस्थिती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे त्याने सुरुवातीपासूनच अभ्यासात वेगळी छाप निर्माण केली होती. परीक्षेच्या काळात त्याने मोबाईल व इतर आकर्षणांपासून दूर राहून पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. त्याच्या मेहनतीला अखेर यशाचे सुंदर फळ मिळाले.

आपल्या यशाबाबत बोलताना साहिल म्हणाला की, “माझ्या आई-वडिलांनी अत्यंत कष्ट करून मला शिक्षण दिले. शाळेतील सर्व गुरुजनांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी हे यश मिळवू शकलो. भविष्यात मोठे अधिकारी बनून समाजासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.” साहिलच्या या प्रामाणिक भावना अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

शिवाजी हायस्कुलच्या शिक्षकांनी देखील साहिलच्या यशाचे कौतुक केले असून त्याने शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखल्याची भावना व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील साहिलच्या घरी भेट देत त्याचा सत्कार केला.

आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, हे साहिल मंडरे याने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. आर्थिक परिस्थितीपेक्षा इच्छाशक्ती आणि मेहनत मोठी असते, याचे उत्तम उदाहरण म्हणून साहिलकडे पाहिले जात आहे. त्याच्या या उज्ज्वल यशामुळे विठ्ठलवाडा तारसा बुज.गावासह संपूर्ण गोंडपिपरी तालुक्याचा शैक्षणिक अभिमान उंचावला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये