चंद्रपूरच्या भुमीवरील रोजगाराचा पहिला हक्क स्थानिक पात्र युवकांचा – रघुवीर अहीर
स्थानिक युवकांना डावलून बाहेरील व्यक्तींना रोजगार देऊ नका

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- दुर्गापूर कोळसा खाणीतील केवीआर ओव्हरबर्डन कंपनी स्थानिकांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी बाहेरील व्यक्तींना देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपा युवा मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांनी दिला आहे.
दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी रघुवीर अहीर यांनी बेरोजगार युवकांसोबत दुर्गापूर येथील केवीआर कंपनीच्या कार्यालयात भेट देत कंपनी प्रशासनासोबत स्थानिक पात्र व बेरोजगार युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याची ठोस मागणी त्यांनी केली. चंद्रपूर शहर व खाण परिसरातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतांना स्थानिक सुशिक्षित, पात्र व बेरोजगार युवकांना डावलून बाहेरील व्यक्तींना रोजगाराच्या संधी दिल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. चंद्रपूरच्या भूमीत उद्योग उभारायचा, स्थानिक संसाधनाचा वापर करायचा आणि रोजगार मात्र बाहेरील व्यक्तींना द्यायचा, हा स्थानिक युवकांवर अन्याय असल्याचे अहीर यांनी नमुद केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात हजारो सुशिक्षित व कुशल युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाच्या धोरणानुसार 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळणे अपेक्षित असतांना कंपन्यांकडून या धोरणाला हरताळ फासला जात असून प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
या चर्चेदरम्यान रघुवीर अहीर यांनी कंपनी प्रशासनास मागण्यांचे निवेदन देत कंपनीतील उपलब्ध रोजगाराच्या संधीमध्ये चंद्रपूर शहर व खाण परिसरातील पात्र स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे, कंपनीत सध्या कार्यरत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची तसेच त्यापैकी स्थानिक कर्मचाऱ्यांची माहिती जाहीर करावी, स्थानिक युवकांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रीया आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच भविष्यातील मनुष्यबळ भरतीमध्ये शासनाच्या धोरणानुसार 80 टक्के स्थानिकांना प्रथम संधी देण्यात यावी. कंपनीला आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण स्थानिक युवकांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि स्थानिक युवकांच्या रोजगाराबाबत कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन द्यावे, अशीही मागणी अहीर यांनी केली आहे.
चंद्रपूरच्या भुमीवरील रोजगाराचा पहिला हक्क स्थानिक पात्र युवकांचा आहे. स्थानिक युवकांच्या भविष्याशी खेळ सहन केला जाणार नाही, असा इशारा रघूवीर अहीर यांनी दिला. कंपनी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्थानिक युवकांना सोबत घेऊन लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे रघुवीर अहीर म्हणाले.
यावेळी गणेश पिंपळकर, श्याम कनकम, सलीम शेख, मयुर भोकरे, पवन पुरेल्ली, अंजय्या मातंगी, सुबोध चिकटे, राहुल सुर्यवंशी, पराग मलोडे, ईश्वर वाघमारे, सुरज मोरपाका, बागेश कोट्टवार, आकाश आसूटकर, वामशी महाकाली, हरीनाथ पुरेल्ली, महेश रामटेके, गणेश तुरानकर, शुभम मेश्राम, नामदेव मडावी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



