पुरस्कारप्राप्त ‘तंटामुक्त’ गावेच अवैध दारूविक्रीच्या विळख्यात.!
अभियान कागदावर, ; गावागावात दारूचा सुळसुळाट., शांतता भंग होत असतानाही प्रशासन झोपेत., नागरिकांचा संतप्त सवाल.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- गावातील तंटे मिटवून सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या तंटामुक्त गाव अभियानाचीच काही गावांमध्ये खिल्ली उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील पुरस्कारप्राप्त तंटामुक्त गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असून, पुरस्कार मिळविण्यापुरतेच अभियान राबविले गेले का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गावातील अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत असून, दारूच्या नशेत होणारे वाद, भांडणे आणि सामाजिक अस्वस्थता वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील करंजी, आक्सापूर, धानापूर, चेकबेरडी, बोरगाव, विठ्ठलवाडा, गोजोली मक्ता, सकमुर, वेडगाव, पोडसा, सोनापूर देशपांडे, लाठी, वेजगाव, खराळपेठ अशा अनेक ग्रामपंचायतींना महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र यातील काही गावांमध्ये सर्रासपणे अवैद्य दारूविक्री सुरू आहे. तंटामुक्त पुरस्काराच्या आनंदाचा सूर्य काही वर्षातच मावळला असून आजघडीला अवैद्य दारूविक्रीत अंधारलेल्या काळ्याकुट्ट रात्रींमध्ये तरुणांच्या आयुष्यांसोबत अनेकांचे संसार धुळीस मिळताना दिसून येत आहेत.
‘तंटामुक्त’चा फलक गायब?
गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले तंटामुक्त गावाचे फलक गायब झाले असून अवैध दारूविक्रीला ऊत आल्याचे चित्र दिसत असल्याने या अभियानाच्या यशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुरस्कार मिळवायचा आणि त्यानंतर गावातील परिस्थितीकडे पाठ फिरवायची, असा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध दारूविक्रीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढत असून गावागावात “दादागिरी” वाढत आहे. परिणामी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याबरोबरच गावातील सामाजिक वातावरणही बिघडत आहे.
समित्या कागदावर..!
गावातील तंटे आणि सामाजिक वाद कमी करण्यासाठी तंटामुक्त समित्यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र गावात अवैध्य दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारी असूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने, समित्यांची कार्यक्षमता आणि प्रशासनाशी त्यांचा समन्वय याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. समित्या कागदावर आणि दारूविक्री प्रत्यक्षात, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शासनाच्या संपूर्ण अभियानाचा उद्देश धोक्यात आला आहे. यामुळे संबंधित गावातील तंटामुक्त समित्यांच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
प्रशासनाची “मूकसंमती..?”
अवैध्य दारूविक्रीच्या वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाकडून प्रभावी कामगिरी होत नसल्याने, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या बाबींकडे मुद्दामहून दुर्लक्ष, निष्क्रियता की स्थानिक दबाव?, यामागचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. संबंधित गावांमध्ये अवैध्य दारूविक्रीच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे दखल घेऊन वस्तुस्थिती तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि तंटामुक्त गावांच्या दर्जांचेही पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



