शेतजमीन विक्रीच्या वादातून भावावर लाकडी दांड्याने हल्ला*
भद्रावती पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतजमीन विक्रीच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून एका व्यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना भद्रावती शहरातील सुरक्षा नगर परिसरात १ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडील माहितीनुसार, गणेश प्रभाकर बदखल (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. सुरक्षा नगर, भद्रावती) हे सकाळी घरी असताना त्यांच्या शेतजमिनीच्या विक्रीवरून वडील प्रभाकर बदखल यांच्याशी चर्चा झाली. जमिनीच्या विक्रीतून पैसे मिळण्याची गरज असल्याचे गणेश यांनी सांगितले. मात्र, वडिलांनी जमीन विकू नये, असे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
यावेळी मोठा भाऊ जगन्नाथ बदखल याने वादात हस्तक्षेप करून लाकडी दांडा आणला आणि गणेश यांच्या पायावर व हातावर मारहाण केल्याची तक्रार आहे. या मारहाणीत पायाला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, जमीन विकल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर गणेश यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण क्रमांक ९४९/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.



