सौरपंपाच्या साथीने माळरानावर फुलतेय हिरवीगार शेती
BAIFच्या पुढाकाराने अहेरीतील गरजू शेतकऱ्यांना सौरपंपांची साथ! ; मेगा पाणलोट प्रकल्पातून शासकीय योजनांचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी BAIF संस्था, अहेरी यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत शासकीय योजनांचे प्रभावी अभिसरण करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात येत आहे. त्यामुळे माळरानावर आता हिरवीगार शेती फुलताना दिसून येत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी असताना, BAIFचे प्रेरक बाबुराव तलांडी यांनी प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांना योजनांची माहिती व मार्गदर्शन केले. त्यातून गरजू शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
या महिन्यात अहेरी तालुक्यातील चार गरजू शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला कृषी सोलर पंप’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सौरपंप मंजूर झाले आहेत. यामध्ये सन्ना झुंगा गावडे, आनंदराज पच्चुजी दुर्गे, केसा पोच्या आत्राम आणि चैत्रू पोच्या आत्राम कोरेर्ली शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पूर्वी विजेच्या समस्येमुळे शेती करणे अनेकदा कठीण होत होते. मात्र, सौरपंपामुळे दिवसाही पाण्याची उपलब्धता होणार असून, शेतीला नियमित सिंचनाची जोड मिळणार आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन उपजीविकेचे शाश्वत साधन निर्माण होण्यास मदत होणार आहे.
*शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
सौरपंपाचा लाभ मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत BAIF संस्था अहेरी आणि प्रेरक बाबुराव तलांडी यांचे आभार मानले. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
BAIF टीमकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असून, येत्या काळात आणखी गरजू शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांशी जोडण्याच्या या उपक्रमामुळे शेतीला आधुनिक साधनांची जोड मिळण्यास मदत होत आहे.



