भद्रावती लघु पशु वैद्यकीय रुग्णालयाला उपचाराची गरज
पशु रुग्णालयाशी संबंधित साहित्य व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्या : नगरसेवक अनिल पडोळे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य पशु संवर्धन व दुग्ध विभागाने तालुक्यातील पाळीव जनावरांना उत्तम वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता भद्रावती शहरापासून काहीश्या लांब ठिकाणी ४०५.३७ लक्ष रुपये खर्चून अद्यावत इमारत उभारण्यात आली. क्षेत्राच्या खासदार यांचे हस्ते मार्च २०२४ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मात्र अवघ्या काही दिवसातच ही इमारत चक्क शोभेची बाहुली झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाह्य भागात सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहे अंतर्गत सर्वच कक्ष असुविधा व साहित्यविना नाममात्र असल्याचे प्रखरतेने जाणवते. शस्त्रक्रिया विभाग आहे मात्र साहित्य नाही, ॲम्ब्युलन्स आहे मात्र नियमित वाहक नाही, ऑक्सिजन पुरवठा सुविधा तोकडी आहे .
तद्वतच तालुका स्तरीय चिकित्सालय असूनही
तज्ञ पशू चिकित्सक, सहाय्यक, शिपाई यांचा अभाव आहे. नाईलाजाने उपचारासाठी येणाऱ्या पाळीव जनावरांवर थातूरमातूर उपचार होत असल्याने काही पाळीव जनावरे दगावल्याची उदाहरणे समोर आली आहेत. भव्य दिव्य इमारत पाहता हे चिकित्सालय अद्यावत असेल असे सकृतदर्शनी वाटते मात्र प्रत्यक्ष निरीक्षण केल्यास शिपाई पदाच्या सेवकाची नेमणूक नसल्याने सहाय्यक पशु चिकित्सक हि जबाबदारी पार पाडत असल्याची शोकांतिका आहे.
या पार्श्वभूमीवर दि.१२ रोजी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय मेश्राम यांचे मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले असून निवेदनातून
तालुका पातळीवरील चिकित्सालयात अद्यावत इमारतीला शोभेल असे आवश्यक असे पुरेसे कर्मचारी, साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे.



