घरकुल लाभार्थ्यांसाठी लिलावातील वाळू घाटांमधून राखीव रेती वितरणास प्रारंभ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यासाठी तहसील प्रशासनामार्फत यापूर्वी तालुक्यातील नऊ नवीन रेती घाट निर्माण करून त्यामधून घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वितरण करण्यात आलेले आहे. सदर उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा सदस्य Sudhir Mungantiwar यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते.
तसेच आता तालुक्यातील वेळवा व आष्टा येथील लिलावातील वाळू घाटांची ताबा पावती पूर्ण झालेली असून शासन नियमानुसार सदर लिलावातील वाळू घाटांमधील दहा टक्के रेती साठा हा घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने तहसील प्रशासन, पोंभुर्णा मार्फत दिनांक 13 मे 2026 पासून पुढील आदेशापर्यंत घरकुल लाभार्थ्यांना राखीव दहा टक्के साठ्यातून दररोज रेती वितरणाचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार मोफत (झिरो रॉयल्टी) रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
घरकुल रेतीचे वाटप हे ओटीपी प्रणालीद्वारे करण्यात येणार असून संबंधित लाभार्थ्यांना ऑनलाईन TP झिरो रॉयल्टी पासेस निर्माण करून देण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित रेती घाटांवर उपस्थित राहून आवश्यक मदत करणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित घाटावर उपस्थित राहावे.
तसेच रेती वाहतूक पूर्ण झाल्यानंतर संबंधित झिरो रॉयल्टी पासेस रोजगार सेवक यांच्याकडे जमा करणे बंधनकारक राहील. सदर रेती वितरण कार्यवाही पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी तसेच संबंधित पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या या लोकहितकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात येत आहे.



