गोंडपिपरीत पेट्रोल पंपावर ग्राहकांची आर्थिक लूट..?
नोझल बंद न करता इंधन भरल्याचा आरोप; चौकशीची मागणी तीव्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील पोलीस स्टेशनसमोरील पेट्रोल पंपावर ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पेट्रोल भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान नोझल योग्य प्रकारे बंद न करता इंधन टाकले जात असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल भरताना मशीन ‘झिरो’वर सेट केल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात नोझल आधीपासूनच सुरू अवस्थेत असते किंवा योग्यरीत्या बंद न करता पुन्हा वापरली जाते. यामुळे ग्राहकांना अपेक्षेपेक्षा कमी इंधन मिळत असून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा घाईत किंवा लक्ष नसताना ग्राहकांना ही बाब लक्षात येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
काही जागरूक ग्राहकांनी हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट दुर्लक्ष किंवा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, संबंधित पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच मोजमाप यंत्रणांची पडताळणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, अशा प्रकारांमुळे सर्वसामान्यांचा विश्वास ढासळत असल्याने प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून ग्राहकांचे हित जपावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



