मृत्यू प्रकरणी घातपाताचा संशय
सखोल चौकशी व आरोपींना अटक करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दि. 15 एप्रिल 2026 रोजी मारोती रामचंद्र कामतवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून घातपाताचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत मृतकाच्या आई व सर्व बहिणी उपस्थित होत्या.
भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत मृतकाची आई यशोदा रामचंद्र कामतवार व ४ बहिणींनी एकत्रितपणे आपली भूमिका मांडली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 एप्रिल रोजी मारोती कामतवार हे भद्रावती येथून देवकार्य आटोपून रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास वेकोली वसाहत, ऊर्जाग्राम ताडाली येथे मोटारसायकलने जात असताना घोडपेठ परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली, तरी घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतदेहावरील जखमांचे स्वरूप पाहता हा प्रकार अपघाती नसून घातपाताचा असल्याचा ठाम संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत कुटुंबीयांनी पोलिस तपासावर नाराजी व्यक्त करत, अद्यापही सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली नसल्याचा आरोप केला. त्यांनी तात्काळ आकस्मिक मृत्यूची नोंद रद्द करून संबंधितांवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तसेच घटनास्थळाचा पुन्हा तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे तपास करून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचेशी संपर्क साधला असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मृतकाचा मृतदेह चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. या घटनेच्या तपासासाठी सक्षम तपास अधिकारी नेमण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू करण्यात येणार आहे.असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, तपासात कोणतीही हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी कुटुंबीयांनी केली. जर योग्य कारवाई झाली नाही, तर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तसेच न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.पत्रपरिषदेत कल्पना इंगोले,कला मोहुर्ले,रंजना मांढरे व मनिषा पचारे या चार बहिणींचा समावेश होता.



