धक्कादायक _ पत्नीकडूनच पतीच्या खुनाची सुपारी
१ लाखात रचला थरारक कट : चार आरोपी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीच्या खुनासाठी स्वतः पत्नीनेच १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे २०२६ रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख रविंद्र तुळशिराम कुळमेथे वय ४६ वर्षे रा. गडचिरोली अशी पटवली.
प्राथमिक तपासात हा अकस्मात मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.
*कारमध्येच गळा आवळून हत्या*
१ मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले.
*संयुक्त कारवाईत आरोपी जेरबंद*
भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार एम एच 31 डी सी 8919 व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
*पोलिसांची दमदार कामगिरी*
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी पो.स्टे. भद्रावती, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पो.उपनिरीक्षक निबोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेन्द्र केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, महिला पो.उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी प्रमुख भूमिका बजावली.
तसेच शोध पथकातील पोलीस कर्मचारी महेन्द्र बेसरकर, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, धर्मराज मुंडे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, प्रेमकुमार बावनकर, रोहित चिटगिरे, महिला पोलीस कर्मचारी करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, किशोर वैरागडे, अमोल सावे, गोपी नरोटे, शेखर मातनकर, दिनेश अराडे, ऋषभ वरकिगे यांनी परिश्रम घेतले.



